महिला आशिया चषक श्रीलंकेतील डंबुला येथे खेळला जात आहे. 26 जुलैला भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताच्या रेणुका सिंगनं जबरदस्त कामगिरी केली.
या सामन्यात भारतानं बांग्लादेशवर 10 गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशनं 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 80 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतानं 81 धावांचं लक्ष्य 11 षटकांत एकही गडी न गमावता गाठलं. यासह भारतीय संघानं सलग 9व्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रेणुका सिंगसह पूजा वस्त्राकरनं गोलंदाजीची धुरा सांभाळली. रेणुकानं पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दिलारा अख्तरला बाद करून आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलं.
ही विकेट मिळताच रेणुकाचा उत्साह वाढला. यानंतर तिनं अतिशय तगडी गोलंदाजी करत बांगलादेशी संघाला धावा करण्याची एकही संधी दिली नाही. तिच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये रेणुकानं केवळ 10 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. या दरम्यान तिनं तब्बल 20 चेंडू डॉट टाकले!
या उत्कृष्ट स्पेलसह रेणुका सिंगनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये मोठी कामगिरी केली आहे. वास्तविक, रेणुकानं टी20 फॉरमॅटमध्ये 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. तिनं आपल्या 46 व्या सामन्यात हा पराक्रम केला. टी20 मध्ये 50 बळी घेणारी रेणुका भारताची आठवी गोलंदाज ठरली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज दीप्ती शर्मा आहे. तिनं आतापर्यंत 129 विकेट घेतल्या आहेत.
आशिया चषकात टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी चांगलीच राहिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं या विश्वचषकात खेळलेले आपले शेवटचे तीनही सामने जिंकले होते. टीम इंडियानं आपल्या विजयी मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध केली. भारताना तो सामना 7 गडी राखून जिंकला. यानंतर दुसऱ्या सामन्यात यूएई आणि तिसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक
“कारण त्याच्याकडे परिपक्व संघ..”, रवी शास्त्रींनी गौतम गंभीरबद्दल केलं मोठं वक्तव्य