भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना 13 जुलै (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात भारतानं 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारतासमोर सामना जिंकण्यासाठी 153 धावांचं लक्ष्य होतं, जे संघानं 15.2 षटकात पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतासाठी सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी यजमान संघाला एकही संधी दिली नाही. यशस्वीनं 53 चेंडूंत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 93 धावा ठोकल्या. तर कर्णधार गिलनं 39 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी 156 धावांची नाबाद भागीदारी केली.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वेनं 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझानं 28 चेंडूत 46 धावांची खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 3 षटकार हाणले. याशिवाय सलामीवीर तदिवनाशे मारुमणीनं 32 आणि वेस्ली माधवेरेनं 25 धावांचं योगदान दिलं. माधेवर-मारुमणी यांनी पहिल्या विकेटसाठी 52 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली. भारताकडून खलील अहमदनं सर्वाधिक 2 बळी घेतले. तर अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
या सामन्याद्वारे वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचा आवेश खानच्या जागी प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. आता मालिकेतील 5वा आणि शेवटचा टी20 सामना रविवारी (14 जुलै) हरारे येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या आता कधी अन् कुठे खेळले जातील सामने
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेऊ शकते का? असं झालं तर स्पर्धा कशी खेळली जाईल?
मराठमोळ्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मिळाली संधी