आशिया-ओशनिया राऊंड २ मध्ये उझबेकिस्तानचा ४-१ असा पराभव करून भारताने जागतिक प्ले ऑफ ग्रुपमध्ये स्थान मिळविले. आता भारतचा सामना कधी आणि कोणाशी होतो ते लवकरच समजेल. डेव्हिस कप जागतिक गटात अर्जेन्टिना हा एक नंबरला राहू शकतो. याची अधिकृत घोषणा मंगळवारी लंडन येथे होईल.
सोमवारी इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशनने जाहीर केलेल्या डेव्हिस कप जागतिक क्रमवारीत क्रोशिया, स्वित्झर्लंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, जपान, रशिया आणि कॅनडा हे संघ आहेत. यातील ५ संघ यापूर्वीच भारतामध्ये खेळले आहेत. त्यामुळे जर भारताला या संघाबरोबर खेळायला लागले तर ते त्या त्या देशात खेळावे लागेल.
जपान आणि रशिया यापूर्वी भारताविरुद्ध त्यांच्या देशात खेळले आहेत. त्यामुळे जर भारताला या देशांविरुद्ध खेळावे लागले तर ते सामने भारतात होतील. भारत आणि कॅनडा संघात आजपर्यंत एकही डेव्हिस कप सामना झालेला नाही. त्यामुळे जर भारत- कॅनडा सामना झालाच तर तो कुठे घ्यायचा याचा निर्णय आयटीएफ घेईल.