या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात जिंकण्यासाठी टीम इंडियाला कोणतीही कसर सोडायची नाही. त्यामुळे टी-२० मालिकेत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जात आहे. आयपीएल २०२२ नंतर, संघाने प्रथम दक्षिण आफ्रिका आणि नंतर आयर्लंडकडून टी-२० मालिका खेळली. यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे सामने खेळले गेले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा ३ वेगवान गोलंदाजांचा शोध संपल्याचे येथील कामगिरीवरून स्पष्ट झाले आहे.
अर्शदीप सिंग ठरतोय भारताची युवा प्रतिभा
इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर नजर टाकली तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ७ विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ७ पेक्षा कमी ईकॉनॉमी रेटने धावा दिल्या. १२ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मध्येही तो उतरला होता आणि त्याने २ विकेट घेतल्या होत्या. त्याने आतापर्यंत एकुण ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ईकॉनॉमीही ६.३३ आहे. त्याने एकूण ५७ टी-२० सामन्यात ६५ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे तो विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.
भुवनेश्वरची उत्कृष्ट कामगिरी
भुवनेश्वर कुमार नवीन चेंडूने अप्रतिम गोलंदाजी करत आहे. वेस्ट इंडिजमध्ये त्याने ४ सामन्यात ३ बळी घेतले. ईकॉनॉमी ७च्या आसपास राहिली. यापूर्वी इंग्लंडमध्ये त्याने २ सामन्यात ४ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंडविरुद्धच्या २ सामन्यात २ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यात ६ बळी घेतले. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठीही तो ओळखला जातो. त्याने एकुण ७२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७३ विकेट घेतल्या आहेत. ईकॉनॉमी ७ पेक्षा कमी आहे. २४ धावांत ५ बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर एकूण २३४ टी-२० सामन्यांमध्ये २३९ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय एका डावात ४ वेळा ४ विकेट आणि २ वेळा ५ विकेट घेतल्या.
बुमराहबद्दल शंका नाही
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल कोणालाच शंका नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याच वेळी, त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात २ विकेट्स घेतल्या. त्याने ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६९ विकेट घेतल्या आहेत. ११ धावांत ३ बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ईकॉनॉमी ६.४६ आहे. त्याने एकूण २०८ टी-२० सामन्यांमध्ये २५५ विकेट घेतल्या आहेत. १० धावांत ५ विकेट सर्वोत्तम आहे. त्याने टी-२० कारकिर्दीत एका डावात दोन वेळा ४ आणि एकदा ५ बळी घेतले आहेत.
मलिक आणि शमी आयपीएलमधून प्रसिद्धी झोतात आले
जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२मध्ये १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आपली छाप सोडू शकला नाही. त्याला ३ सामन्यात फक्त २ विकेट घेता आल्या. ईकॉनॉमी १२च्या वर होती. शमीने आयपीएलमध्ये २० विकेट घेतल्या. पण त्याला टी-२० साठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. त्याचप्रमाणे उमेश यादवने आयपीएलच्या १२ सामन्यात १६ आणि टी नटराजनने ११ सामन्यात १८ विकेट घेतल्या. मात्र, यांनाही भारतीय संघातही स्थान मिळाले नाही. आवेश खानने टी-२० लीगच्या १३ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु तो देखील अर्शदीपप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण केल्यामुळे टी-२० विश्वचषकातील चौथा वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याचे स्थान निश्चित झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फ्लोरिडामध्ये असणाऱ्या टीम इंडियाने पाहिली CWG २०२२ची थरारक फायनल, फोटो होतोयं व्हायरल