टी२० मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडला ३-० ने व्हाईटवॉश दिल्यानंतर यजमान भारताचे लक्ष येत्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेवर आहे. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथील कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर या स्वरुपात पहिल्यांदाच भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने येतील. त्यामुळे न्यूझीलंडला कानपूर कसोटीत पराभूत करत भारताला या महत्त्वपूर्ण सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल.
भारतीय संघासाठी या सामन्यात कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम ही सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट असेल. भारतीय संघ या मैदानावर कसोटी सामन्यात गेल्या ३८ वर्षांपासून अजेय राहिला आहे.
शेवटचा पराभव वेस्ट इंडिजविरुद्ध
भारतीय संघाने ग्रीन पार्क स्टेडियमवर आतापर्यंत २२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ ७ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले असून ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला या मैदानावर शेवटचा पराभव १९८३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने या मैदानावर ८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यातील ५ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे. तर उरलेले ३ सामने अनिर्णीत ठेवले आहेत.
विजयाचा चौकार मारण्याची संधी
भारतीय संघाने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरील मागील सलग ३ कसोटी सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला येता कसोटी सामना जिंकत या मैदानावर विजयाचा चौकार मारण्याची संधी असेल. २००८ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिका संघाला ८ विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर २००९ मध्ये श्रीलंका (१ डाव आणि १४४ धावा) आणि २०१६ मध्ये न्यूझीलंड (१९७ धावा) संघांवर विजय मिळवत भारताने हॅट्रिक केली होती.
अश्विनला संधी देणे भारतीय संघासाठी फायद्याचे
महत्त्वाचे म्हणजे, कानपूरच्या मैदानावर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याचे प्रदर्शन अतिशय प्रशंसनीय राहिले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध २०१६ मध्ये झालेल्या मागील कसोटी सामन्यात तब्बल १० विकेट्स चटकावल्या होत्या. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ९३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात १३२ धावा देत ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्यामुळे जर कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने अश्विनला या सामन्यात संधी दिली, तर भारतीय संघाचे पारडे जड बनेल.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात टू टीम इंडिया व्हाया हरियाणा; हर्षल पटेलचा रोमांचक प्रवास
“कारकीर्द पुढे न्यायची असल्यास हार्दिकला शरीरावर लक्ष द्यावे लागेल”
ऐकलंत का! बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य; म्हणतेय, ‘द्रविड माझं पहिलं प्रेम’