हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोची सामन्यात विंडिजचा दुसरा डाव 127 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 72 धावांचे आव्हान आहे. भारताकडून या डावात उमेश यादवने 4 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
विंडिज दुसऱ्या डावात 56 धावांनी पिछाडीवर होते. त्यानंतरही त्यांची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर फलंदाज क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल हे दोघेही भोपळाही न फोडता बाद झाले.
मात्र त्यानंतर शिमरॉन हेटमेयर(17) आणि शाय होपने(28) डाव सांभाळला होता. परंतू हे दोघेही 39 धावांची भागीदारी करुन अनुक्रमे 13 आणि 14 व्या षटकात बाद झाले. यानंतर मात्र विंडिजच्या अन्य फलंदाजांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या.
हेटमेयर आणि होप व्यतिरिक्त सुनील अँब्रीस(38), कर्णधार जेसन होल्डर(19) आणि देवेंद्र बिशू(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.
या डावात भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 45 धावांत 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी रविंद्र जडेजा(3/12), कुलदीप यादव(1/45) आणि आर अश्विन(2/24) यांनी विकेट घेतल्या.
तत्पूर्वी भारताने तिसऱ्या दिवसाची पहिल्या डावातील 4 बाद 308 धावांपासून सुरुवात केली मात्र भारताला यात फक्त 59 धावांची भर घालता आली. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेले रिषभ पंत(92) आणि अजिंक्य रहाणे(80) तिसऱ्या दिवशी लवकर बाद झाले. या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.
भारताने पहिल्या डावात सर्वबाद 367 धावा केल्या. विंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने या डावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
महत्वाच्या बातम्या-
–उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…
–भारताच्या या दिग्गजाने रिषभ पंतची गिलख्रिस्टशी केली तुलना
–काय सांगता! क्रिकेट खेळण्यासाठी गेलने केला तब्बल २० लाख किलोमीटरचा प्रवास