भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका आपल्या नावावर केली. या विजयानंतर भारतीय संघाचे खेळाडू आणि त्याचबरोबर प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे सुद्धा खूप कौतुक झाले आहे.
सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवि शास्त्री पदभार सांभाळत आहेत. रवि शास्त्री हे भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि कर्णधार आहेत. रवि शास्त्री यांचा ऑस्ट्रेलिया दौरा नेहमीच चांगला राहिला आहे. भारतीय संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रवि शास्त्री यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. रवि शास्त्री 1985 साली विश्वचषक मालिकेत मालिकावीर ठरले होते. त्यांनंतर 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी संथ खेळी साकारली होती. आता भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पाणी पाजले आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या सोबत खूप क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे रवि शास्त्री यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवि शास्त्री यांच्यामध्ये सर्वात मोठी खासियत ही आहे की, त्यांना माहित आहे की खेळाडूंना कसे प्रेरित करता येते.
दिलीप वेंगसरकर एएनआय सोबत बोलताना म्हणाले, “रवि शास्त्री यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते खेळाडूंना नेहमी प्रेरित करतात. या पातळीवर आलेल्या खेळाडूंकडे कौशल्य असते. त्यामुळे या खेळाडूंना मानसिकरीत्या तयार करण्याची गरज असते. ते काम शास्त्री करतात आणि खेळाडूमधे सकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे खेळाडूंमध्ये फरक पडतो. ”
भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवि शास्त्री यांची 2017 साली निवड करण्यात आली. मात्र, या अगोदर 2014 ते 2015 पर्यंत ते संघाचे डायरेक्टर होते. रवि शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाविरुद्ध पराभव झाला होता. त्यांनंतर रवि शास्त्री यांच्या प्रशिक्षणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पुढे वाढवला जावू नये अशी मागणी जोर धरत होती.
मात्र, त्यानंतर भारतीय संघाने 2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे रवि शास्त्री यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला. त्याचबरोबर 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरी पर्यंत पोहचला होता. त्यामुळे बीसीसीआयने रवि शास्त्री यांच्यावर दाखवलेला विश्वास पुन्हा सार्थकी ठरला.
भारतीय संघातील खेळाडूंना रवि शास्त्री एक मित्र म्हणून खूप मानतात. त्यामुळे भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटी मालिकेत तीन सामन्यात नेतृत्व करताना दोन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. अजिंक्य रहाणेने या विजयात रवि शास्त्री यांचे सुद्धा योगदान असलेले मान्य केले होते.
चौथ्या सामन्यानंतर रवि शास्त्री यांच्याबद्दल बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “त्यांच्या योगदानाचे महत्व खूप आहे. खासकरून त्यांनी ज्या प्रकारे या मालिकेतच नव्हे, तर 2018-19 मध्ये सुद्धा संघाचे समर्थन केले होते, जेव्हा आम्ही मालिका जिंकली होती. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. ते स्वतः एक कर्णधार होते. ज्या प्रकारे त्यांनी संघाला समर्थन दिले आहे, त्यामुळे माझे काम सोपे झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तुझ्याशिवाय आयपीएल पहिल्यासारखं असणार नाही”, मलिंगाच्या निवृत्तीने रोहित आणि बुमराह झाले भावूक
एक केदार जाधव गेला अन् दुसरा आला! सीएसकेच्या ताफ्यात सहभागी झालेला उथप्पा चाहत्यांकडून ट्रोल
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका हा संघ जिंकेल, मायकल वॉन यांची पुन्हा भविष्यवाणी