ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात रंगणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी तिकिटांची विक्री मागील आठवड्यात सुरू झाली आहे. सुरुवातीला इतर देशांच्या सामन्यांची तिकीट विक्री होत असतानाच, गुरुवारी (31 ऑगस्ट) भारतीय संघाच्या तीन सामन्यांच्या तिकिटांची विक्री झाली. मात्र, यावेळी चाहत्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून आले. अनेकांना दोन दोन तास वेटिंगमध्ये राहूनही तिकीट न मिळाल्याने अनेकांनी आपली निराशा व्यक्त केली.
बुधवारी भारतीय संघाच्या सराव सामन्यांची तिकिटे विक्रीस निघाली होती. चाहत्यांनी त्याला भरघोस प्रतिसाद देत अवघ्या काही तासात ही तिकिटे विकली गेली. 30 सप्टेंबर रोजी भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंड विरुद्ध गुवाहाटी येथे तर 3 ऑक्टोबर रोजी दुसरा सराव सामना नेदरलँडविरुद्ध त्रिवेंद्रम येथे होणार आहे..
गुरुवारी भारतीय संघाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध अफगाणिस्तान व भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यांची तिकिटे विक्रीस होती. बुक माय शो या वेबसाईटवर ही तिकिटे विकली जाणार होती. मात्र, चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यास सुरुवात करताच वेबसाईट क्रॅश झाली. काहींना दोन तास वाट पाहावी लागेल असे संदेश दिले गेले. काही वेळा तर तुमचा क्रमांक तीन महिन्यानंतर येऊ शकतो असे म्हटले.
हे सर्व प्रकार घडत असले तरी यात सर्वसामान्यांचे तिकिटे पूर्णपणे विकली गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही तिकिटे नक्की मिळाली कोणाला? असा सवाल संतप्त चाहत्यांनी विचारला.
भारतीय संघाच्या न्यूझीलंड, इंग्लंड व श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांची तिकीट विक्री 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी नेदरलँड व बांगलादेश तर 3 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांची तिकिटे विकली जाणार आहेत.
(India Matches 2023 ODI World Cup Ticket Booking Site Crash But Tickets Sold Out)
हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार