दक्षिण आफ्रिका महिला संघाने पहिल्या टी २० सामन्यात भारतीय महिला संघासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू क्लो ट्रायऑनने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ४ बाद १६४ धावा केल्या.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने डावाची सुरुवात चांगली केली पण वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणारी सलामीवीर फलंदाज लिझेल लीची विकेट लवकर गमावली.
ली बाद झाल्यानंतर सून लुसने कर्णधार डेन व्हॅन निएकर्कला चांगली साथ दिली पण तीही १८ धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर काहीवेळातच निएकर्कही ३१ चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील हीच सर्वाधिक वयक्तिक धावसंख्या आहे.
तिसऱ्या वनडेत नाबाद अर्धशतकी खेळी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून मिग्नॉन द्यू प्रीझने या सामन्यातही थोडीफार लढत दिली. तिने २७ चेंडूत ३१ धावा केल्या. यानंतर मात्र नादिन डे क्लर्क आणि क्लो ट्रायऑनने आणखी पडझड न होऊ देता अखेच्या काही षटकात चांगली फटकेबाजी केली. डे क्लर्कने २५ चेंडूत २३ धावा तर ट्रायऑनने ७ चेंडूत ३२ धावा केल्या. तिने या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार खेचले.
भारताकडून अनुजा पाटील(२/२३), पूजा वस्त्रकार(१/३४) आणि शिखा पांडे (१/४१) यांनी बळी घेतले.