सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने ३ बाद ३५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे लक्ष्य ठेवले.
आजही भारताचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल(४) आणि मुरली विजय(९) यांनी आपले बळी लवकर गमावले. राहुलला लुंगी एन्गिडीने बाद केले तर विजयला कागिसो रबाडाने त्रिफळाचित केले. या दोघांच्या पाठोपाठ काही वेळातच एन्गिडीने पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला (५) पायचीत बाद केले. सध्या चेतेश्वर पुजारा(११*) आणि पार्थिव पटेल(५*) नाबाद खेळत आहेत. भारताला जिंकण्यासाठी अजून २५२ धावांची गरज आहे.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने १२१ चेंडूत ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने १० चौकार मारले. तसेच काल तिसऱ्या दिवसाखेर डिव्हिलियर्स बरोबर नाबाद असलेला डीन एल्गारनेही आज अर्धशतक झळकावले. त्याने १२१ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांनाही मोहम्मद शमीने बाद केले.
त्यांच्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि व्हर्नोन फिलँडर(२६) यांनी थोडीफार लढत दिली. पण बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही. डू प्लेसिसचे अर्धशतक फक्त २ धावांनी हुकले. डू प्लेसिसला ४८ धावांवर जसप्रीत बुमराहने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
भारताकडून मोहम्मद शमी (४/४९) , जसप्रीत बुमराह(३/७०), इशांत शर्मा(२/४०) आणि आर अश्विन(१/७८) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावात संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद ३३५ धावा
भारत पहिला डाव: सर्वबाद ३०७ धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव: सर्वबाद २५८ धावा
भारत दुसरा डाव: ३ बाद ३५ धावा
चेतेश्वर पुजारा(११*) आणि पार्थिव पटेल(५*) खेळत आहेत.