१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आज पार पडलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १८९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात बंगालच्या ईशान पोरेलने ४ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून आर्यन जुयाल(८६) आणि हिमांशू राणा(६८) या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने ८ बाद ३३२ धावा केल्या होत्या. या दोघांनी त्यांच्या खेळीत प्रत्येकी ८ चौकार आणि १ षटकार मारला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली.
भारतीय संघाने सुरवातही चांगली केली होती कर्णधार पृथ्वी शॉ(१६) आणि मानज्योत कारला(३१) यांनी ५४ धावांची सलामी भागीदारी रचली होती. त्याबरोबरच अभिषेक शर्मा(३५), अनुकूल रॉय(२८) आणि कमलेश नागरकोटी(२६) यांनी देखील धावांची भर घातली.
भारताने दिलेल्या ३३३ धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली. त्यांच्याकडून फक्त जीन डु प्लेसिसने(५०) अर्धशतक केले. बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही.
भारताकडून ईशान(४/२३), नागरकोटी(२/१५), अभिषेक शर्मा(२/१६), अनुकूल रॉय(१/३१) आणि शिवा सिंग(१/९) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला ३८.३ षटकात सर्वबाद १४३ धावतच रोखले.
काल वरिष्ठ भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता.