क्रिकेट विश्वातील सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान हे संघ मागील आठ वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. उभय देशांमधील राजकीय संबंध तणावपूर्ण असल्याने या द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. परंतु, दोन्ही संघ आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये नेहमीच आमने-सामने येत असतात. मात्र, जगभरातील क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा हे दोन्ही देश द्विपक्षीय मालिकांमध्ये भिडताना दिसतील. यासाठी दुबई क्रिकेट कौन्सिलने पुढाकार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विपक्ष मालिका होत नसल्याने आता दुबई क्रिकेट कौन्सिलने उभय देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेचे यजमानपद भूषवण्याची तयारी दाखवली आहे. दुबई क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख अब्दुल रहमान फलकनाझ यांनी याबाबतची इच्छा बोलून दाखवली. फलकनाझ म्हणाले,
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका येथे झाल्यास आम्हाला आनंद होईल. यापूर्वी देखील शारजा येथे दोन्ही देशांमध्ये क्रिकेट झालेले आहे. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील अनेक प्रतिष्ठित लोक येथे येऊन सामन्याचा आनंद घेत असत. हे सामने एखाद्या युद्धाप्रमाणे असतात. खेळातील हे युद्ध सर्वांनाच पाहायला आवडेल.”
यूएईने केले मोठ्या स्पर्धांचे आयोजन
संयुक्त अरब अमिरातीमध्ये मागील काही काळापासून अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन झाले आहे. जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचे सलग दोन हंगाम याठिकाणी खेळले गेले. तसेच नुकताच टी२० विश्वचषक यूएईमधील दुबई, अबुधाबी व शारजा या मैदानांवर संपन्न झाला. युएई येथे भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांची संख्या लक्षणीय असल्याने, या ठिकाणी मालिकांचे आयोजन झाल्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभेल. उभय देशांमध्ये २०१३ पासून एकदाही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही देशांमधील राजकीय स्थिती नेहमीच तणावपूर्ण असल्याने त्यााााचा परिणाम खेळांवर होताना दिसून येतो.