टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आता हळूहळू मावळत चालली आहे. पाकिस्तान सरकारने भारतासोबतचा सामना न खेळण्याचा (बॉयकॉट) निर्णय आधीच जाहीर केला आहे.
तत्पूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणात पुढाकार घेत पीसीबीला (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) पत्र लिहिले होते. 15 फेब्रुवारीला होणारा भारत-पाकिस्तान सामना खेळावा, अशी विनंती श्रीलंकेने केली होती. या पत्रामध्ये त्यांनी या सामन्यामुळे होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानाचाही उल्लेख केला होता. तसेच, कठीण काळात श्रीलंका नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला आहे, याची आठवणही करून दिली होती.
श्रीलंकेच्या या पत्राला पाकिस्तानकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. रिपोर्टनुसार, त्यांचे हात बांधलेले आहेत. भारतासोबत न खेळण्याचा निर्णय हा सर्वस्वी पाकिस्तान सरकारचा आहे आणि बोर्ड सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही.
अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पीसीबीला हा सामना न खेळण्याचा हट्ट सोडण्याचा सल्ला दिला आहे. तरीही पीसीबी अजून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला, तर आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच चाहत्यांना ‘भारत-पाकिस्तान’ हा रोमांचक थरार पाहता येणार नाही.






