विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता भारतीय संघ दुसर्या कसोटी सामन्यातून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. परंतु पुढील तीन कसोटी सामन्यांत विराट कोहली भारतीय संघाचा भाग असणार नाही. तसेच, प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हादेखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. हे दोन्ही खेळाडू संघात नसणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय. तरीही, पूर्ण सामर्थ्याने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याची क्षमता भारतीय संघाकडे नक्कीच आहे.
विराट व शमीची अनुपस्थिती आणि काही खेळाडू खराब फॉर्म असतानाही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कडवी स्पर्धा देऊ शकतो. यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संघ व्यवस्थापनाला मोठ्या सावधगिरीने अंतिम अकरा खेळाडूंची निवड करावी लागेल. २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतीय संघ असा असू शकतो.
फलंदाज
खराब फॉर्ममध्ये असलेल्या युवा पृथ्वी शॉच्या जागी युवा खेळाडू शुबमन गिलला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. दुसरा सलामीवीर म्हणून मयंक अगरवाल संघात कायम असेल. तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी चेतेश्वर पुजारा भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळेल. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळेल. विराटच्या जागी नेतृत्त्व करणारा अजिंक्य रहाणे हा पाचव्या स्थानावर संघाला मजबुती देईल.
यष्टीरक्षक आणि अष्टपैलू
पहिल्या सामन्यात तितकासा प्रभावी न ठरलेल्या अनुभवी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाला या सामन्यातून डच्चू मिळू शकतो. त्याच्याजागी सराव सामन्यात शतक ठोकणारा रिषभ पंत ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत खेळेल. पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास अष्टपैलू रवींद्र जडेजा हनुमा विहारीची जागा घेईल. अव्वल फिरकीपटू आर अश्विन गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देण्याचा प्रयत्न करेल.
वेगवान गोलंदाज
मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने भारताची वेगवान गोलंदाजी काहीशी कमजोर भासत आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत तितकासा प्रभावी ठरला नव्हता. आपला चौथा ऑस्ट्रेलिया दौरा खेळणारा उमेश यादव पहिल्या सामन्यात बळी मिळविण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराज आपले कसोटी पदार्पण करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन्ही सराव सामन्यात सिराजने प्रभावी मारा केला होता.
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत असेल भारताचा संभाव्य संघ-
मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर आश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना