वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांत निर्भैळ यश मिळवल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हे स्थान आणखी भक्कम करण्यासाठी लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होईल. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देईल, याविषयी जाणून घेऊया.
सलामीवीर-
श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत कर्णधार रोहित शर्मा सलामी देणे निश्चित आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अपयशी ठरलेल्या ईशान किशनच्या जागी दुसरा सलामीवीर म्हणून महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड याला संधी मिळू शकते. ऋतुराजला वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली होती. मात्र, तो केवळ चार धावा बनवू शकलेला.
मधली फळी-
अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर, चौथ्या क्रमांकावर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. यष्टीरक्षक रिषभ पंतच्या अनुपस्थित ईशान किशन हा फिनिशरची तसेच यष्टीरक्षकाची भूमिका बजावू शकतो. सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला आणखी संधी मिळणे निश्चित आहे.
फिरकी गोलंदाज-
बऱ्याच कालावधीनंतर संघाचा अव्वल अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करेल. तो सातव्या स्थानी फलंदाजीला मजबुती देईल. श्रीलंकेविरुद्ध म्हणून युवा लेगस्पिनर रवी बिश्नोई हा पुन्हा संघात दिसेल.
वेगवान गोलंदाज-
उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. त्याच्यासह हर्षल पटेल व आवेश खान यांना पहिल्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्र्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना- २४ फेब्रुवारी- लखनऊ
दुसरा टी२० सामना- २६ फेब्रुवारी- धर्मशाला
तिसरा टी२० सामना- २७ फेब्रुवारी- धर्मशाला
महत्वाच्या बातम्या-