कानपुर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडिअमवर तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५० षटकात ३३८ धावांचे आव्हान दिले आहे.
या सामन्यात भारताची फलंदाजी चांगलीच बहरली. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद ३३७ धावा केल्या. भारताकडून दोन शतके झाली. यात सलामीवीर रोहित शर्माने १४७ धावा तर कर्णधार विराट कोहलीने ११३ धावा केल्या.
भारताची सुरुवात थोडी खराब झाली. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात तंबूत परतला, त्याने १४ धावा केल्या. नंतर मात्र कर्णधार विराट फलंदाजीला उतरला आणि भारतीय संघाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. रोहित आणि विराटने द्विशतकी भागीदारी केली.
विराट आणि रोहित यांच्या जोडीने ४ वेळा द्विशतकी भागीदारी केली आहे. वनडेत सर्वात जास्तवेळा द्विशतकी भागीदारी करण्याच्या यादीत विराट आणि रोहितची जोडी या सामन्यातील भागीदारीमुळे अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
या आधी गौतम गंभीर – विराट, सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, माहेला जयवर्धने-उपुल थरांगा या जोड्यांनी प्रत्येकी ३ वेळा द्विशतकी भागीदारी केली आहे.
रोहित १३८ चेंडूत १४७ धावा करून बाद झाला. त्याने या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण १५० षटकार ठोकले आहेत. तसेच आपल्या या वर्षातल्या १००० धावाही पूर्ण केल्या आहेत. भारतीय संघाने पुन्हा एकदा अष्टपैलू हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. परंतु त्याला संधी साधता आली नाही, तो केवळ ८ धावा करून बाद झाला.
हार्दिक पाठोपाठ लगेचच विराट कोहलीने १०६ चेंडूत ११३ धावा करून बाद झाला. अनुभवी एम एस धोनी ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आक्रमक सुरुवात केली होती परंतु अखेरच्या षटकात तो १७ चेंडूत २५ धावा करून बाद झाला.
या नंतर मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव डावाच्या अखेरच्या चेंडूवर १८ धावा करून बाद झाला आणि मागील सामन्यात अर्धशतक करणारा दिनेश कार्तिक ४ धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडकडून मिचेल सॅन्टनेर, टीम साऊथी आणि ऍडम मिल्ने यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.