कटक। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांचे लक्ष्य श्रीलंका संघ समोर ठेवले आहे. भारताकडून के एल राहुलने अर्धशतक केले आहे.
या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. आज शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या बरोबर राहुल सलामीला खेळायला आला. या दोघांनी सुरुवात चांगली केली होती. परंतु रोहित १७ धावा करून बाद झाला.
त्यानंतर राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या श्रेयश अय्यरने फटकेबाजी करताना ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांची जोडी तोडण्यात नुवान प्रदीपला यश मिळाले. त्याने श्रेयसला २४ धावांवर असताना निरोशान डिकवेल्लाकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्याच्या पाठोपाठ काही वेळातच राहुलही ४८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या या अर्धशतकी खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारला. या नंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या एम एस धोनीने आणि मनीष पांडेने आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद ६८ धावांची भागीदारी रचली.
धोनीने २२ चेंडूत नाबाद ३९ धावा आणि पांडेने १८ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. या डावाच्या शेवटच्या चेंडूवर धोनीने त्याच्या शैलीत षटकार खेचून भारताला १८० धावांचा टप्पा गाठून दिला.
श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूज(१९/१) , नुवान प्रदीप(३८/१) आणि थिसेरा परेरा(३७/१) यांनी बळी घेतले.