टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते. मात्र, भारतीय संघाचे सुपर १२ सामन्यात अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताच्या आशा आता जर-तर सारख्या परिस्थितीवर अडकल्या आहेत. भारतीय संघाने स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. भारत यापुढे उपांत्य फेरी गाठू शकणार नाही, असे बहुतांश चाहत्यांना वाटत आहे. पण भारतीय संघाच्या आशा इतक्याही कमी झालेल्या नाहीत. क्रिकेटमध्ये कोणता संघ कधी कोणाला हरवेल याचा अंदाज बांधणे सोपे नाही. त्यामुळेच अनेक भारतीय चाहत्यांना स्कॉटलंडकडून विजयाची अपेक्षा आहे. स्कॉटलंडच्या संघाने आज न्यूझीलंडला पराभूत केले तर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत परत येऊ शकतो.
बुधवारी (३ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकात स्कॉटलंड विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. आता जर भारताला सेमीफायनल खेळायची असेल तर अफगाणिस्तानविरुद्ध फक्त जिंकावे लागणार नाही, तर पुढचे दोन सामनेही जिंकावे लागतील. यासह भारतीय संघाला स्कॉटलंड संघ न्यूझीलंडचा पराभव करेल अशी आशा बाळगावी लागेल.
जर भारताप्रमाणेच न्यूझीलंडनेही दोन सामने गमावले तर भारत आणि न्यूझीलंड या दोघांचे समान गुण होऊ शकतात आणि त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे गुणतालिकेत कोणता संघ सरस आहे हे ठरवले जाईल. अशा पद्धतीने भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत परतण्याची संधी मिळू शकते.
अफगाणिस्तानही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानासाठीच्या शर्यतीत भारताला मदत करू शकतो. या समीकरणानुसार भारताने तिन्ही सामने जिंकले तर संघाचे ६ गुण होतील. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडवर मात केली तर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे गुणही ६-६ गुणांवर अडकतील. म्हणजेच इथेही नेट रन रेट निर्णायक ठरेल. पण या समीकरणात एक गोष्ट अशी आहे जी भारतासाठी कठीण होऊ शकते. अफगाणिस्तानचा नेट रन रेट ३ पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानचा संघ भारत किंवा न्यूझीलंडपेक्षा चांगल्या धावगतीने दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो.
अफगाणिस्तानच्या चांगल्या नेट रन रेटमुळे भारताच्या आशा स्कॉटलंडकडून जास्त आहेत. स्कॉटलंडप्रमाणेच नामिबियानेही प्रत्येक सामना गमावला असून तो उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने गट २ मधून आपले पहिले चारही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता या गटात क्रमांक दोनसाठीची लढत राहिली आहे. इंग्लंडने गट १ मधून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नवा ‘सिक्सर किंग’: ९३ धावांच्या खेळीसह गप्टिल बनला टी२० चा ‘बॉस’
अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा करणार गोलंदाजी? सराव सत्रात दिसले निराळे दृश्य, पाहा व्हिडिओ
“अफगाणिस्तान असा संघ नाहीये, ज्याला तुम्ही सहजासहजी पराभूत कराल”






