भारतीय संघाच्या २०१९ ते २०२३ या चार वर्षातील आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना तयार झाली आहे. या योजनेप्रमाणे जर सर्व काही बरोबर घडले तर भारतीय संघ या चार वर्षात एफटीपी ( Future Tours Programme ) नुसार १५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
बीसीसीआयने तयार केलेल्या भविष्यातील कार्यक्रमात भारतीय संघ २०१९ पासून ३७ कसोटी, ६७ वनडे आणि ५४ टी २० सामने खेळणार आहे. या १५८ सामन्यांपैकी ८५ होम आणि ७३ अवे सामने होणार आहेत.
भारत कसोटीत १९ होम आणि १८ अवे, वनडेत ३८ होम आणि २९ अवे आणि टी २०त २८ होम सामने खेळणार आहे.
भारतीय संघाने साधारण किती होम आणि अवे सामने खेळावेत यावर बरीच चर्चा झाली आहे. त्यात अनेकदा खेळाडूंनी अतिक्रिकेट होत असल्याचे म्हटले होते, त्यामुळे त्यावरही चर्चा झाली.
भारतीय संघाने या वेळापत्रकाला मान्यता दिली आहे तसेच या बद्दलची आयसीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर सिंगापूरमध्ये बैठकीत चर्चा झाली आहे. पुढील वर्षात २०१८ मध्ये भारतीय संघ विदेशी दौरेच करणार आहेत.
५ जानेवारी पासून दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर आयपीएल असेल. आयपीएल संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे दौरे करणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचे दक्षिण आफ्रिका बरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी मालिका घेण्याचा प्रयत्न आहे.
या मालिकेत ५ कसोटी, ३ वनडे आणि १ टी २० सामना असेल. त्याचबरोबर २०१८-१९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्या विरुद्धही भारतात मालिका घेण्याविषयी चर्चा झाली.
या विषयी आज नवी दिल्लीत बीसीसीआयची सर्वसाधारण बैठकीत चर्चा झाली.