पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या सामन्यात तो भारतीय फलंदाजांना त्रास देण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरुद्ध भारताची काय रणनीती असावी, याबाबत आर अश्विनने सांगितले आहे.
भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने पाकिस्तानचा तारिक त्याच्या साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करत असेल तर भारतीय फलंदाजांसाठी त्याने एक सोपा उपाय सांगितला आहे. त्याने म्हटले, ‘तारिक चेंडू टाकताना थांबला, तर फक्त क्रिजपासून दूर जा.’
तारिक त्याच्या थांबत चेंडू टाकण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे. त्याने केवळ ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने सहापेक्षा कमी इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना ११ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तेथिल खेळपट्टी संथ असल्याने तारिक चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलच्या ‘एश की बात’ यामध्ये बोलताना म्हटला, “जर गोलंदाज चेंडू टाकण्याआधी थांबत असेल तर फलंदाजाने क्रिजपासून दूर व्हावे. तेव्हा फलंदाज म्हणून शकतो की मला वाटले तो थांबला आहे. मात्र यावेळी पंचांच्या अडचणी वाढतील.”
“मी तेथे असतो तर हेच केले असते. सामना जिंकण्यासाठी नियमानुसार खेळणे महत्वाचे असते. मी केवळ हेच म्हणेल की मला नाही माहित तो कधी चेंडू टाकेल आणि मी तेथून हटलो. जर मी क्रिजपासून दूर जात असेल, तर ती पचांची जबाबदारी आहे”, असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.
तारिकवर सामन्यावेळी किती दबाव असेल याबद्दलही अश्विन म्हणाला, “सामन्यादरम्यान तारिकवर पडणाऱ्या दबावाबाबत कल्पना करा, तो एक रोमांचक अनुभव असेल. तो संघाचा हुकुमी इक्का आहे. फलंदाजाने अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली तर तो काय करेल, याचा विचार करा.”
तारिकच्या चेंडू फेकण्याच्या ऍक्शनला इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने अवैध मानले होते. तसेच आयसीसीनेही दोनदा त्याच्या गोलंदाजीची ऍक्सन तपासली असून त्यामध्ये त्यांना काहीच अवैध आढळले नव्हते.






