भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयची निवड समिती लवकरच मालिकेसाठी संघाची घोषणा करेल. सध्या टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहूनच संघ निवडला जाईल.
निवड समिती या मालिकेत यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला संधी देऊ शकते. डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाल्यापासून पंतनं भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता त्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं.
निवड समितीनं टी20 विश्वचषकानंतर रिषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संधी दिली होती. पंतनं टी20 सामन्यात 49 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर त्याला विशेष काही करता आलं नाही. तो आता दुलीप ट्रॉफीमध्ये चमकत आहे. इंडिया ए विरुद्धच्या सामन्यात पंतनं 47 चेंडूंचा सामना करत 61 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तो पहिल्या डावात केवळ 7 धावा करून बाद झाला होता.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलही दावेदार आहे. पण त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसते. राहुलनं श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 30 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुलीप ट्रॉफीमध्ये तो इंडिया ए संघाचा भाग आहे. पहिल्या सामन्यात मात्र तो काही कमाल करू शकला नाही. यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राहुलच्या ऐवजी युवा ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकते.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान
हेही वाचा –
करोडोंमध्ये आहे शुबमन गिलची संपत्ती! क्रिकेटशिवाय अन्यही उत्पन्नाचे स्रोत; वाढदिवशी सर्वकाही जाणून घ्या
केएल राहुलला झालं तरी काय? दुलीप ट्रॉफीतही सूर गवसेना, कसोटी संघातील स्थान डळमळीत
विराट कोहलीला 10 वेळा बाद करणाऱ्या दिग्गज फिरकीपटूची अचानक निवृत्ती