भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. भारत वर्ष २०२५ मध्ये महिला वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी भारतात २०१३ मध्ये महिला विश्वचषक खेळला गेला होता. या विश्वचषकातील अंतिम सामना मुंबईत झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला हरवत जेतेपद पटकावले होते.
बर्मिंघम येथे आयसीसीच्या (ICC) बैठकीदरम्यान २०२४-२०२७ पर्यंतच्या महिला जागतिक स्पर्धांबद्दल निर्णय घेण्यात आले. थोडक्यात बैठकीत ५ वर्षांचा भविष्य दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. यातील २०२५ सालच्या वनडे महिला विश्वचषकाचे (ODI World Cup 2025) यजमानपद भारताच्या हाती आले. तर महिलांच्या टी२० विश्वचषक २०२४ चे यजमानपद बांगलादेश आणि २०२६ चे टी२० विश्वचषक यजमानपद इंग्लंड भूषवेल. बांगलादेशमध्ये टी२० विश्वचषक होण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच महिला टी२० चँपियनशीपचा पहिलावहिला हंगाम श्रीलंकेत २०२७ मध्ये होईल.
क्लेअर कॉनर, सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि रिकी स्केरिट यांच्यासह मार्टिन स्नेडेन यांच्या अध्यक्षतेखालील बोर्ड उप-समितीच्या देखरेखीखाली स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे आयसीसी स्पर्धांसाठी यजमानांची निवड करण्यात आली. आयसीसी बोर्डाने या समितीच्या शिफारशींना स्विकारले आहे. यावर्षी बर्मिंघममध्ये राष्ट्रमंडल खेळांमध्ये महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामन्यांची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत ८ संघ सुवर्णपदक विजयासाठी मैदानात उतरतील.
महिला वनडे विश्वचषक २०२५ चे यजमानपद मिळाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आनंद व्यक्त केला आहे. “आम्ही आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चे यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक होतो. मला आनंद आहे की, आम्हाला या महत्त्वपूर्ण खेळाच्या आयोजनाचे अधिकार मिळाले. महिला क्रिकेटची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आयसीसीसोबत मिळून काम करेल आणि सर्व आवश्यकता पूर्ण करेल,” असे गांगुलीने म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा
“हुड्डा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरतोय”