आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड रिचर्डसन यांनी गुरुवारी(31 जानेवारी) 2023 चा वनडे विश्वचषक भारतातच होणार असल्याचे जाहिर केले आहे.
बीसीसीआयने 2016च्या टी20 विश्वचषकाचा कर न दिल्याने आयसीसी 2021ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 विश्वचषक या दोन स्पर्धेचे भारताचे यजमान पद रद्द करण्याची शक्यता होती. 23 मिलियन युएस डॉलर (160 कोटी रुपये) एवढा कर आयसीसीने बीसीसीआयला 31 डिसेंबरपर्यत भरण्यास सांगितला होता.
याबद्दल रिचर्डसन एका कार्यक्रमात म्हणाले, ‘आयसीसीसाठी कर चूकता करणे महत्त्वाचे असते. यातून आलेले पैसे आयसीसी खेळालाच परत देते. विंडिज सारख्या क्रिकेट बोर्डला यातून मदत दिली जाते. कारण ते बीसीसीआयप्रमाणे जास्त महसूल मिळवू शकत नाही.’
‘पण असे असले तरी भारताचे यजमानपद काढण्याचे कोणतीही योजना नाही. आम्हाला विश्वास आहे हे प्रकरण लवकरच संपेल.’
रिचर्डसन यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताने डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमला मान्यता देणे ही सर्वोत्तम गोष्टींपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर 2020 च्या टी20 विश्वचषकात भारत पाकिस्तान हे वेगळ्या गटात असण्याबद्दल रिचर्डसन म्हणाले, ‘गटात विश्वासार्हता असणे आवश्यक आहे. आम्ही हे गट पाडण्यासाठी स्नेक मेथडचा वापर करतो. यात क्रमवारीतील पहिला संघ गट अ मध्ये जातो, तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ गट ब मध्ये जातो. आम्हाला दोन्ही गटात समतोल साधायचा असतो.’
याबरोबरच रिचर्डसन यांनी 2019 च्या विश्वचषकात भारत सर्वश्रेष्ठ संघ असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
–तिसऱ्या वनडेत मिताली राजने रचला इतिहास, असा कारनामा करणारी बनली पहिलीच महिला क्रिकेटपटू
–भारतीय रेल्वे संघाने जिंकले ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
–हे भारतीय खेळाडू त्यांच्या २००व्या वन-डे सामन्यात ठरले आहेत यशस्वी