विंडीजचा संघ या वर्षी भारत दौरा करणार आहे. त्यांचा हा दौरा निश्चित झाला असून यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विंडीज संघ भारतात येणार आहे. याबद्दल सौरव गांगुलीने पुष्टी दिली आहे.
विंडीजचा संघ भारताविरुद्ध या दौऱ्यात ३ कसोटी, ५ वनडे आणि १ टी २० सामना खेळणार आहे. त्यातील टी २० सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. पण अजून कसोटी आणि वनडे सामन्यांची ठिकाणे घोषित झालेली नाही.
याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष गांगुली म्हणाला, ” आम्ही विंडीज विरुद्ध होणारा एक टी२० सामना ईडन गार्डनवर घेणार आहोत.”
विंडीज संघाने या २०१४ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात विंडीज संघ कसोटी मालिका आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळला. पण विंडीज खेळाडूंचे त्यांच्या क्रिकेट बोर्डाबरोबरचे वाद वाढल्याने त्यांनी धरमशाला येथे होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्याआधी पुढील मालिका खेळण्यास नकार दिला होता.
त्यानंतर विंडीज संघ फक्त टी २० विश्वचषक खेळण्यासाठी २०१६ला भारतात आला होता. तर भारताने २०१५ नंतर दोनदा विंडीज दौरा केला आहे.