मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धेवरही कोरोनाचे गडद सावट दिसत आहे. विश्वचषकानंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचे आहे.
ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात भारत एकूण चार कसोटी सामने खेळणार आहे. या कसोटी सामन्यांची ठिकाणे देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निश्चित करण्यात आली आहेत.
दुसरा कसोटी सामना ११ डिसेंबर ऍडलेड, तिसरा २६ डिसेंबर मेलबर्न, चौथा ३ जानेवारी सिडनी येथे होणार आहे. यातील अॅडिलेड येथे होणारा दुसरा कसोटी सामना हा डेनाईट सामना होण्याची शक्यता आहे.
मागील दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. स्टिव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी त्याच्यावर बंदी लादण्यात आली होती. त्यामुळे ते या कसोटी मालिकेत खेळू शकले नाहीत.