19 वर्षांखालील भारतीय संघाविरुद्ध 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा मंगळवार, 24 जुलैपासून दुसरा चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज पवन शहाने एक खास विक्रम रचला आहे.
त्याने या सामन्यात पहिल्या डावात 332 चेंडूत 33 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 282 धावा केल्या. याबरोबरच त्याने युवा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम केला आहे.
त्याने हा विक्रम करताना तन्मय श्रीवास्तवचा 220 धावांचा विक्रम मागे टाकला आहे. तन्मयने 2006 मध्ये 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाविरुद्ध हा पराक्रम केला होता.
त्याचबरोबर या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या गौतम गंभीरच्या 212 आणि चेतेश्वर पुजाराच्या 211 धावांनाही पवनने मागे टाकले आहे.
तो या सामन्याच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो पहिल्या दिवसाखेर नाबाद 177 धावांवर खेळत होता. त्याच्याबरोबरच सलामीवीर फलंदाज अथर्व तायडेनेही पहिला दिवस शतकी खेळी करत गाजवला. पवन या सामन्यात निशान मदुष्का करवी धावबाद झाला.
या दोघांनी केलेल्या शतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 8 बाद 613 धावांवर घोषित केला आहे.
याबरोबरच पवनने काही खास विक्रम केले आहेत. तो युवा कसोटी क्रिकेट तसेच वरिष्ठ कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद होणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय ज्यूनिअर क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा आॅस्ट्रेलियाच्या क्लिंटन पेकनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. पेकने 1995 मध्ये भारताविरुद्ध नाबाद 304 धावा केल्या होत्या.
या सामन्यात बुधवारी (25 जुलै) श्रीलंका संघाने दुसऱ्या दिवसाखेर 4 बाद 140 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहित जांग्राने 3 आणि सिद्धार्थ देसाईने 1 विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतो तब्बल ८० लाख रुपये तर ख्रिस्तीयानो रोनाल्डो…
–निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल
–भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघ जाहिर, वरीष्ठ संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना संधी