शनिवारपासून(२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धूरा वाहणार आहे.
विराट कोहली परतला मायदेशी –
विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवुड अभेनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती असून ती त्यांच्या पहिल्या अपत्याला जानेवारी २०२१ मध्ये जन्म देणार आहे. त्यामुळे आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजा घेतली असून तो भारतात परतला आहे.
विराटच्या अनुपस्थिती अजिंक्य रहाणे कर्णधार –
अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा नियमित उपकर्णधार आहे. त्यामुळे आता तो विराटच्या अनुपस्थितीत भारताचे प्रभारी कर्णधार असेल. रहाणेला याआधीही भारताचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.
रहाणेचा कर्णधारपदाचा अनुभव –
रहाणेने आत्तापर्यंत ७ आंततराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात २ कसोटी, ३ वनडे आणि २ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्याने नेतृत्व केलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात आणि तिन्ही वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मात्र त्याने नेतृत्व केलेल्या २ टी२० सामन्यांपैकी १ भारताने जिंकला आहे, तर १ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.
रहाणेसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे त्याने नेतृत्व केलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात विजयाची गोडी चाखली आहे.
मेलबर्नवर भारताचा चांगला रेकॉर्ड –
मागील १० वर्षात भारताने ३ कसोटी सामने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळले आहेत. त्यातील २०११ ला झालेल्या सामन्यात भारताला १२२ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तर २०१४ ला झालेला सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच २०१८ ला झालेल्या सामन्यात भारताने १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विजय मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मिळवले आहे. या मैदानात भारताने ३ कसोटी सामने जिंकले आहेत. त्यातील पहिला सामना भारताने सन १९७७ ला जिंकला होता. तर दुसऱ्यांदा भारताने सन १९८१ ला या मैदानात विजय मिळवला. त्यानंतर थेट २०१८ ला विजय मिळवण्यात भारताला यश मिळाले होते.
मेलबर्न पाठोपाठ भारताने ऍडलेड येथे २ विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण
‘बॉक्सिंग डे’ कसोटी : सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी चक्क लढली ‘कुस्ती’
मस्त प्लॅन हैं! बाळाच्या जन्माआधी ऑस्ट्रेलियन अँकरचा विराटला अजबच सल्ला, म्हणाली…
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम