संयुक्त अरब अमीराती (युएई) येथे २७ ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होत आहे. स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील आपला पहिला सामना खेळणार आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिलाच सामना असेल. दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून बंद आहे. आयसीसीच्या स्पर्धेतच या दोन संघांमध्ये सामने होत असतात. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते आशिया चषकात होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात ज्या पाच फलंदाजांकडून दोन्ही संघांना अपेक्षा असतील त्या फलंदाजांविषयी आपण जाणून घेऊया.
रोहित शर्मा-
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यावर निश्चितच सर्वांची नजर असेल. रोहित मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असला तरी, या अति महत्त्वाच्या सामन्यात तो फॉर्ममध्ये येण्याची शक्यता आहे. रोहित आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ शतके ठोकणारा एकमेव फलंदाज असून, आशिया चषकात त्याला जगातील सर्वात यशस्वी टी२० फलंदाज होण्याची संधी असेल.
बाबर आझम-
भारतीय कर्णधार रोहित शर्माप्रमाणेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या कामगिरीकडे देखील सर्वजण डोळे लावून बसतील. सध्या अफाट फॉर्ममध्ये असलेला बाबर टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मागील वर्षी टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा तो प्रयत्न करेल.
सूर्यकुमार यादव-
भारताचा एबी डिव्हिलियर्स अशी ख्याती मिळवलेला सूर्यकुमार यादव हा देखील या आशिया चषकात चमकताना दिसेल. बाबर पाठोपाठ तो फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहेत. इंग्लंड व वेस्ट इंडीजमध्ये तो अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला होता. भारताला आशिया चषकावर पुन्हा कब्जा करायचा असल्यास सूर्यकुमारचा खेळ होणे गरजेचे आहे.
हार्दिक पंड्या-
भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच दमदार खेळ करताना दिसतो. आशिया चषकातही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा सर्वांना असेल. आयपीएलपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हार्दिक दिनेश कार्तिकसह भारताच्या फिनिशिंग विभागाची जबाबदारी सांभाळेल.
आसिफ अली-
पाकिस्तानचा फिनिशर म्हणून आसिफ अली याने मागील काही काळात आपली ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षी टी२० विश्वचषकात मोक्याच्या क्षणी शानदार फलंदाजी करून त्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते. आता पाकिस्तानला २०१२ नंतर आशिया चषक जिंकायचा असल्यास त्याची भूमिका पुन्हा एकदा निर्णय ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर इथं शतक हाणून बसलाय अन् विराटला साधा सिक्स मारायला जमंना!
‘त्याला कोरोना झालाच नाही, हे तर फक्त…’; शास्त्री गुरूजींचे अजब विधान
नशिब फुटकं ते फुटकंच! प्लेइंग ११ मध्ये संधी न मिळाल्याने माजी दिग्गजाने बीसीसीआयला झापलं