अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ चा दुसरा उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) सामना ४ फेब्रुवारी रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुलावायो येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अंतिम फेरीचे (फायनल) तिकीट निश्चित केले. भारताकडून आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आता ६ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारताने अफगाणिस्तानवर ७ गड्यांनी मात करत जेतेपदाच्या लढतीत प्रवेश मिळवला.
भारतीय संघाने अंडर-१९ एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीतील सर्वात मोठा ‘रन चेज’ (धावांचा यशस्वी पाठलाग) करण्याचा विक्रम नोंदवला. यापूर्वी सेमीफायनलमध्ये ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य कधीही गाठले गेले नव्हते. आता ६ फेब्रुवारीला फायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३१० धावा केल्या होत्या. सलामीवीर उस्मान सादात आणि खालिद अहमदझई यांना मोठी खेळी करता आली नाही; उस्मानने ३९ तर खालिदने ३१ धावा केल्या. मात्र, त्यानंतर फैसल शिनोझादाने ९३ चेंडूत ११० धावांची खेळी केली, तर उझैरुल्लाह नियाझईने ८६ चेंडूत नाबाद १०१ धावा ठोकल्या. या दोघांनीही जबरदस्त फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. दीपेशने १० षटकांत ६४, तर कनिष्कने ९ षटकांत ५५ धावा दिल्या.
३११ धावांच्या लक्ष्याचा पीछा करताना भारताला दमदार सुरुवात मिळाली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी करत मैदानात वादळ निर्माण केले. त्याने अवघ्या ३३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली, ज्यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. वैभव बाद झाल्यानंतर आरोन जॉर्जने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला; त्याने १०४ चेंडूत ११५ धावा केल्या. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेनेही ५९ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. भारताने ४१.१ षटकांत ३११/३ धावा करून हा सामना दिमाखात जिंकला.






