भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 22 सप्टेंबरपासून दिमाखात सुरुवात झाली. यातील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडिअमवर पार पडला, जो भारताने 5 विकेट्स राखून आपल्या खिशात घातला. या सामन्यानंतर आता उभय संघ इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर रविवारी (दि. 24 सप्टेंबर) दुसरा सामना खेळणार आहेत. या सामन्यातही केएल राहुल याच्या नेतृत्वातील भारत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तसेच, ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. दोन्ही संघांना विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. चला तर, यापूर्वी उभय संघातील दुसऱ्या सामन्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
कशी आहे इंदोरच्या होळकर स्टेडिअमवरील खेळपट्टी?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या सामन्यापूर्वी इंदोरच्या होळकर स्टेडिअमच्या खेळपट्टीवर एक नजर टाकायची झाली, तर इथे फलंदाजांना खूप मदत मिळते. इंदोरच्या या स्टेडिअमची सीमारेषा खूपच लहान आहे. त्यामुळे फलंदाज सहज चौकार-षटकारांची बरसात करताना दिसतात. या मैदानावर फलंदाजांनी अनेक विक्रम रचले आहेत. एकीकडे वीरेंद्र सेहवाग याने या मैदानावर आपले द्विशतक ठोकले होते. तसेच, रोहित शर्मा यानेही 35 चेंडूत शतक साजरे केले होते. मागील वेळीही जेव्हा भारतीय संघाने या मैदानावर आपला सामना खेळला होता, तेव्हा शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतक झळकावले होते, यामुळे भारताने 385 धावांचा डोंगर उभारला होता. अशात या सामन्यातही खूप धावा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
कसे असेल हवामान?
इंदोरमधील हवामानाबद्दल बोलायचं झालं, तर येथे दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत पावसाची 40 ते 50 टक्के शक्यता वर्तवली जात आहे. अशात सामन्याची सुरुवात 1 वाजता नाणेफेकीने होईल. तसेच, पहिला चेंडू दुपारी दीड वाजता टाकला जाईल. मात्र, हा सामना वेळेत सुरू होईल की पुन्हा पावसामुळे उशिरा सुरू होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सायंकाळी 6 वाजता 51 टक्के पाऊस पडू शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता 20 टक्क्यांहूनही कमी आहे. अशात या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (india vs australia 2nd odi match know pitch report holkar stadium indore )
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात डी कॉक खेळणार शेवटचा वनडे विश्वचषक! पाहा मागच्या दोन हंगामांमधील यष्टीरक्षक फलंदाजे रेकॉर्ड्स
‘विश्वचषक ट्रॉफीसाठी रॅली आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना पहिली’ – रोहित पवार