कोलकाता । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना येथे होत आहे. कोलकाता येथील इडन गार्डन हे देशातील सर्वाधिक कसोटी आणि वनडे सामने आयोजित केलेलं मैदान आहे. मोठा इतिहास, मोठं मैदान म्हटलं की कोणत्याही क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर हे मैदान येते.
फुटबॉल हा अतिशय प्रसिद्ध खेळ असणाऱ्या या शहरात सार्वधिक कसोटी सामने आणि वनडे सामने आयोजित केले ही एक आश्चर्यजनक गोष्टच. सध्या या शहरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरु आहे आणि त्यात आज वनडे सामना. त्यामुळे हे शहर सजले आहे. एखाद्या सणाप्रमाणे हजारो क्रिकेटप्रेमी मैदानावर हजर आहेत. मग एक क्रिकेटप्रेमी म्हणून आपल्याला काही गोष्टी माहित हव्याच ज्या या ऐतिहासिक मैदानावर होत आहे.
असाच काही खास रेकॉर्डचा महा स्पोर्ट्सने घेतलेला हा खास आढावा…
१. ऑस्ट्रलियाने कोलकत्याच्या या ऐतिहासिक मैदानावर या आधी फक्त २ वनडे सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे हे दोनही सामने अंतिम सामने होते. १९८७ विश्वचषक अंतिम सामना आणि २००३ टीव्हीएस कप अंतिम सामना.
२. या संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघातील एकही खेळाडूने या आधी या इडन गार्डन्सच्या मैदानावर एकही वनडे सामना खेळला नाही.
३. भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला इडन गार्डन्सचे हे मैदान खूप लकी आहे असे दिसून येते. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिन्ही फॉरमॅटमधील रोहितच्या एका डावातील सर्वाधिक धावा याच मैदानावर आल्या आहेत. वनडे २६४, कसोटी ११७, टी-२० १०९ असे त्याचे आंतरराष्ट्रीय सर्वोच धावसंख्या आहेत.
४. विराट कोहलीने या मैदानावर जेव्हा शेवटचा सामना आयपीएलमध्ये केकेआर विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात आरसीबीचा संघ ४९ धावांवर सर्वबाद झाला होता.
५. त्या सामन्यात केकेआरकडून खेळत असलेल्या कोल्टर-नाईलने आरसीबीच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. आजच्या ही सामन्यात कोल्टर-नाईल खेळत आहे पण ऑस्ट्रलियाकडून.