भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना २७ नोव्हेंबरला सिडनी येथे खेळला जाईल. दुसरा सामनाही याच मैदानावर होईल. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे खेळला जाईल.
वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा एकतर्फी पराभव केला होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयातील ही एक भळभळती जखम आहे. एकूण आकडेवारीबद्दल विचार केला तर, ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाच्या वरचढ राहिला आहे. उभय संघात आतापर्यंत १४० वनडे सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने ७८ तर भारताने ५२ विजय मिळवले आहेत.
एकूण आकडेवारी खराब असतानाच, ऑस्ट्रेलियात खेळलेल्या वनडे सामन्यांत तर, भारतीय संघाची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. भारताने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियात ५१ वनडे सामने खेळले असून, त्यातील ३६ सामन्यात भारताला पराभवाची चव चाखावी लागली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात अवघे १३ वनडे विजय मिळू शकला आहे.
या सर्व आकडेवारीच्या दरम्यान, भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात काही ऐतिहासिक खेळीदेखील केलेल्या दिसून येतात. आज, त्यापैकीच अव्वल तीन खेळींविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
३. रोहित शर्मा १७१ (२०१६)
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पर्थ येथे ही लाजवाब खेळी केली होती. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने हा निर्णय योग्य सिद्ध केला. त्याने संपूर्ण ५० षटके फलंदाजी करत १६३ चेंडूत १७१ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ७ षटकार लगावले. रोहितने विराट कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २०७ धावांची अमूल्य भागीदारी रचली होती.
३०९ धावा उभारूनही भारतीय संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्टीव्ह स्मिथने १३५ चेंडूत १४९ आणि जॉर्ज बेलीने १२० चेंडूंत ११२ धावा फटकावत अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
२. युवराज सिंग १३९ (२००४)
सन २००४ च्या व्हीबी सीरिजमधील सातवा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळवला गेला. भारतीय संघाने ८० धावांवर आपले तीन प्रमुख फलंदाज गमावले होते. त्यानंतर, युवराज सिंग व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आकर्षक खेळ्या करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
युवराजने ब्रेट ली व जेसन गिलेस्पी या दिग्गज गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. युवराजने १२२ चेंडूंचा सामना करत १३९ धावा फटकावल्या होत्या. तर दुसरीकडे, लक्ष्मणने १३० चेंडूत १०६ धावांची संयमित व जबाबदारीपूर्ण खेळी साकारली होती. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २१३ धावा जोडून भारताला २९६ अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
भारताने अथक मेहनतीने उभारलेल्या धावसंख्येवर पावसाने पाणी फेरले. पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला ३४ षटकात २२५ धावांचे आव्हान देण्यात आले. ऍडम गिलख्रिस्टच्या ७२ चेंडूंतील ९५ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला तरी, सामनावीराचा पुरस्कार युवराजला मिळाला.
१. सचिन तेंडुलकर ११७ (२००८)
सन २००८ च्या सीबी सीरीजच्या ‘बेस्ट ऑफ थ्री फायनल्स’ मधील पहिली फायनल सिडनी येथे खेळवली गेली. भारतासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान. मात्र, भारताचे पहिले तीन गडी झटपट तंबूत परतले. अनुभवी सचिन तेंडुलकरने एक बाजू लावून धरत, भारताचा डाव सावरला होता.
सचिनने १२० चेंडूंचा सामना करताना १० चौकारांसह ११७ धावांची खेळी करून भारताला विजयी केले. त्यावेळी युवा असलेल्या रोहित शर्माने ८७ चेंडूत ६६ धावा काढत, सचिनला योग्य साथ दिली होती. भारताने ६ गड्यांनी सामना आपल्या नावे केला होता. पुढे, दुसरी फायनल जिंकत, भारतीय संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका विजय साजरा केला.
ट्रेंडिंग लेख-
टीम इंडियाचं हे ‘त्रिकुट’ उडवू शकतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सर्वाधिक दांड्या
श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित
महत्त्वाच्या बातम्या-
‘गती वाढवण्यासाठी मला ड्रग्ज घेण्यास सांगितले होते’, ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरचा मोठा खुलासा
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश