भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या 3 सामन्यांची टी- 20 मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर 1- 1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेचा तिसरा सामना आज नागपूर येथे खेळविण्यात येईल.
बांगलादेश आणि भारत यांच्यातील ही पहली द्विपक्षीय टी -20 मालिका असून ही मालिका जिंकणारा संघ इतिहास घडवेल.
पहिल्या टी20 सामन्यात मुशफिकुर रहीमने केलेल्या नाबाद 60 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने विजय मिळवत मालिकेला सुरूवात विजयी सुरुवात केली होती. टी -20 सामन्यात बांगलादेशचा हा भारताविरुद्ध पहिलाच विजय होता.
पण त्यानंतर दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या 85 धावांच्या जोरावर भारताने 26 चेंडू बाकी ठेवत 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत बरोबरी झाली. आता तिसरा सामना आज नागपूरला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.
तिसऱ्या टी20साठी प्लेईंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो बदल
पहिल्या सामन्यात 37 आणि दुसऱ्या सामन्यात 44 धावा देणारा वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसनला या सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळणार का, हे पहाणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
आतापर्यंत नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर 11 टी20 सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आठ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे.
बांगलादेश समोर आहे हे आव्हान-
बांगलादेशची चिंता त्याची फलंदाजी आहे. बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मात्र तीच लय कायम राखण्यात या मालिकेत अपयश आले आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात लिटन दास आणि मोहम्मद नईम यांनी प्रथम विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. नईम ने 36, दास ने 29, कर्णधार महमुदुल्ला आणि सौम्य सरकार ने 30-30 धावा करून बाद झाले.
एकही फलंदाज चांगली सुरूवात करुनही मोठया धावा करु शकला नाही. 20 षटकानंतर पाहुण्या संघाच्या खात्यात 153 धावा होत्या. मालिकेचा पहिल्या सामन्यात रहिमने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बांगलादेशला विजय मिळवणे सोपे गेले.
रोहित, चहल संघासाठी महत्तवाचे
मधल्या षटकांत विकेट घेण्याची क्षमता आपल्याकडे आह लेगस्पिनर युजवेंद्र चहलने पुन्हा एकदा राजकोट येथे दुसऱ्या टी20 सामन्यात सिद्ध केले.
राजकोटमध्ये बांगलादेशला 153 धावांवर रोखण्यात चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच या सामन्यात रोहित शर्मानेही 85 धावांची शानदार खेळी खेळली. हीच लय तिसऱ्या सामन्यातही कायम राहो, अशी अनेकांची आपेक्षा असेल.
याबरोबरच कुलदीप यादवच्या जागी संघात निवडलेला वॉशिंग्टन सुंदर खूप फायदेशीर ठरला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो यावर लक्ष असेल.
भारतीय फलंदाजीबद्दल बोलयचे झाल्यास या मालिकेत रोहितशिवाय श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. पण केएल राहुल आणि रिषभ पंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत.
पहिल्या दोन सामन्यांत शिखर धवनने अनुक्रमे 41 आणि 31 धावा केल्या आहेत पण हळू फलंदाजीमुळे त्यांच्यावर टीका झाली आहे.
आता आज होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यात कोणता संघ बाजी मारत मालिका जिंकणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.