रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघानं दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा नायक आर अश्विन होता, ज्यानं बॅट आणि बॉलनं धमाकेदार कामगिरी केली. पहिल्या डावात अश्विन कठीण परिस्थितीत फलंदाजीला आला आणि शतक झळकावलं. एकवेळ टीम इंडियानं 144 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर अश्विननं रवींद्र जडेजासोबत 199 धावांची भागीदारी केली आणि संघाला 387 धावांपर्यंत नेलं. यानंतर चौथ्या डावात त्यानं 6 बळी घेत पाहुण्या संघाला 234 धावांवर रोखलं. अश्विनशिवाय रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनीही शतकं झळकावली. तर जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात 4 बळी घेतले.
चेन्नई कसोटीतील भारताच्या या अष्टपैलू कामगिरीनंतर आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या कसोटीकडे लागल्या आहेत. बीसीसीआयनं पहिल्या सामन्यानंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी संघ जाहीर केला. भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटीशी संबंधित महत्त्वाची माहिती येथे जाणून घेऊया.
- भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळला जाईल
- हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे.
- भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात येतील.
- या कसोटी सामन्याचं टीव्हीवर ‘स्पोर्ट्स 18’ चॅनलवर थेट प्रक्षेपण होईल. याशिवाय तुम्ही मोबाईलवर ‘जिओ सिनेमा’ (JioCinema) वर या सामन्याचा आनंद घेऊ शकता.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
हेही वाचा –
बुद्धिबळात भारतीयांचा डंका! 3 सुवर्णपदकांसह धमाकेदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेनं लाज राखली, अफगाणिस्ताननं 3-0 ने केला असता क्लीन स्वीप
3 युवा खेळाडू ज्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली, भारताच्या कसोटी संघात मिळू शकते जागा