भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेने भारतात ८ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसोबतच प्रेक्षकही भारतीय स्टेडियमवर परतले आहेत. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यांमध्ये प्रेक्षक पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये दिसले. कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातही क्रिकेट चाहत्यांचा असाच उत्साह कायम आहे. मात्र, मुंबईत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात असे होणार नाही. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यासाठी दररोज केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे चाहत्यांची तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची निराशा झाली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्याने पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयाचा साक्षीदार असलेल्या या मैदानावर शेवटचा कसोटी सामना २०१६ मध्ये खेळला गेला होता. ज्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केलेला. तेव्हापासून येथे कसोटी सामन्याची प्रतीक्षा होत होती. आता ही प्रतीक्षा संपली असून, भारतीय संघ पुन्हा या मैदानावर परतत आहे. मात्र, यासह प्रेक्षक संख्येच्या निर्बंधामूळे, क्रिकेट चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले मुंबई शहर अजूनही कोविडमुक्त झालेले नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने पूर्ण क्षमतेने मैदानावर प्रेक्षक येऊ देण्यास परवानगी दिलेली नाही. एमसीएला प्रेक्षक क्षमता ५० टक्क्यांनी वाढवण्याची परवानगी मिळण्याची आशा आहे. एका वृत्तसंस्थेने एमसीएच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केलेल्या सामान्य आदेशानुसार, आतापर्यंत २५ टक्के प्रेक्षकांना वानखेडे कसोटीसाठी परवानगी दिली जाईल. मात्र, एमसीएला आशा आहे की, महाराष्ट्र सरकार ५० टक्के प्रेक्षकांनाही परवानगी देऊ शकते.”
भारताच्या अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये ३०,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी कोविड-१९ च्या महामारीमुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या. या सामन्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमनही होईल. यासोबतच भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीही या सामन्यातून मैदानात परतणार आहे. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेमधील पराभवानंतर कोहलीने काही काळ सुट्टी घेतली होती. ज्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका आणि पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता.