भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार होता. परंतु पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. अद्याप या सामन्यात नाणेफेकही झालेली नाही.
या मालिकेचा जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलशी संबंध आहे. फायनलमधील स्थानासाठी भारतीय संघ जोरदार शर्यतीत आहे. मात्र पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला, तर त्याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागू शकतो. यामागील संपूर्ण समीकरण आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगत आहोत.
भारतानं अलीकडेच मायदेशात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा पराभव केला. टीम इंडियानं बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. आता आणखी काही सामने जिंकून WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याकडे भारतीय संघाची नजर असेल. टीम इंडिया सध्या 11 कसोटी सामन्यांत 8 विजय आणि 74.24 टक्क्यांच्या विजयी सरासरीसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला अजूनही चार विजय आणि एक किंवा दोन ड्रॉ आवश्यक आहेत.
रोहित शर्मा आणि कंपनीला अजूनही 8 कसोटी खेळायचे आहेत. मात्र त्यापैकी फक्त 3 सामने मायदेशात आहेत, तर 5 वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात खेळले जातील. अशा स्थितीत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करून भारताचा फायनलचा मार्ग सोपा होईल. मात्र या मालिकेतील कोणताही सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, तर टीम इंडियाला नुकसान सहन करावं लागू शकतं.
आता बंगळुरू कसोटीचा खेळ कधी सुरू होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. बंगळुरूमध्ये बुधवार सकाळपासून सतत पाऊस पडतोय. त्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपची फायनल पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळली जाईल.
हेही वाचा –
वरुणराजा थांबेना! भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया
आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, संघाला मिळाला नवा बॉलिंग कोच!
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!