टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्याशिवाय मैदानात उतरेल. या दोन्ही खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, याआधी भारतीय संघ रोहित आणि विराटशिवाय टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधी खेळला होता? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
टी20 वर्ल्ड कप 2007 च्या ग्रुप स्टेज सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. डर्बनमध्ये झालेल्या त्या सामन्यात रोहित आणि विराट दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हते. विशेष म्हणजे विराट कोहली त्यावेळी भारतीय संघाचा भागही नव्हता. हा सामना आधी टाय झाला होता, त्यानंतर ‘बॉल आऊट’मध्ये भारताने पाकिस्तानचा 3-0 ने पराभव केला होता. 2010 ते 2024 पर्यंत झालेल्या प्रत्येक टी20 वर्ल्ड कपमध्ये, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित किंवा विराट (किंवा दोघेही) खेळले होते. 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर या दोघांनी निवृत्ती जाहीर केली. आता तब्बल 19 वर्षांनंतर भारतीय संघ या दोन दिग्गजांशिवाय पाकिस्तानचा सामना करणार आहे.
याआधी आशिया कप 2025 मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी झाला होता. त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकूण 3 सामने झाले होते आणि तिन्ही वेळा भारताने पाकिस्तानला धुळ चारली होती. आता तोच फॉर्म संघ या वर्ल्ड कपमध्येही कायम राखू इच्छितो.
रोहित आणि विराट संघात नसले तरी भारताकडे पाकिस्तानला पराभूत करू शकणारे एकापेक्षा एक धडाकेबाज खेळाडू आहेत. इशान किशन, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खेळाडू पाकिस्तानच्या अडचणी वाढवू शकतात. तर गोलंदाजीमध्ये फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे असेल, तर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल.






