विराट कोहलीच्या (virat kohli) नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ (indian test team) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची सुरुवात बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी होणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्यावर सोपवली गेली आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी केएल राहुलने बीसीसीआय टीव्हीसाठी मुलाखत दिली. ही मुलाखत भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याने घेतली.
भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार घोषित केले होते. परंतु मुंबईत सराव करताना त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. अशात केएल राहुल आगामी कसोटी मालिकेत संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे.
बीसीसीआय टीव्हीसाठी मयंक अगरवालने राहुलची मुलाखत घेतली. यावेळी मयंकने त्याला संघाच्या उपकर्णधारपदाविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राहुल म्हणाला की, “सहा महिन्यांपूर्वी मला वाटत होते की, मी आता कधीच कसोटी क्रिकेट खेळणार नाही, पण लवकरच गोष्टी बदलल्या आणि यामुळे मी खूप आनंदी आहे. उपकर्णधाराची जबाबदारी मिळणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. माझ्यावर एक खूपच मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे. मी माझे सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहे. माझे एकच लक्ष आहे की, मी संघाचे लक्ष्य गाठण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावावे.”
मुलाखतीत मयंकने राहुलला विचारले की, तुझे केस तर पांढरे होऊ लागले आहेत. यावर राहुल म्हणाला, “आयपीएलमधील कर्णधारपदामुळे माझे केस पांढरे झाले आहेत. भारतीय संघाच्या जबाबदारीमुळे तर अजूनपर्यंत हे झाले नाही. पण जर असे झाले, तर मला अजून चांगले वाटेल. भारताचे उपकर्णधारपद सर्वांनाच हवे असते. अशात पांढऱ्या केसांची चिंता नसेल.”
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याविषयी राहुल म्हणाला, “बॉक्सिंग डे कसोटी सामन्याविषयी माझ्या काही आंबट-गोड आठवणी आहेत. मी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातूनच पदार्पण केले होते. मात्र, सामन्यात जास्त चांगले प्रदर्शन करू शकलो नव्हतो. नंतर बॉक्सिंग डे कसोटी झाल्यावर मला संघातून बाहेर केले गेले आणि माझ्या जागी मयंक अगरवाल संघात आला. मला माहिती होते की, मी संघातून बाहेर होणार आहे, कारण मी धावा केल्या नव्हत्या.”
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचा अखेरचा शिलेदार हरभजन सिंग निवृत्त
शुबमन गिल म्हणतोय, “मला ‘त्या’ आयपीएल संघात खेळायला आवडेल”
अश्विन-शास्त्री वाद एक पाऊल पुढे! माजी प्रशिक्षक म्हणतायेत, “अश्विनला वाईट वाटल्याचा आनंद”
व्हिडिओ पाहा-