कटक। उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळवण्यात येणार आहे.
भारताने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या वनडे मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. या मालिकेत भारताला पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर मात्र भारताने मालिकेत पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकून मालिकाही जिंकली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रभारी कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने त्याचे वनडेतील तिसरे द्विशतक केले होते.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपर्यंत झालेल्या ११ टी २० सामन्यात भारताने ७ तर श्रीलंकाने ४ सामन्यात विजय मिळवला आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या टी २० मालिकेत भारताने वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा आणि बेसिल थंपी या नवीन चेहऱ्यांना १५ जणांच्या संघात संधी दिली आहे.
या मालिकेतही वनडे मालिकेप्रमाणे रोहित शर्मा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधार पदाची धुरा सांभाळेल.
भारताने मागील महिन्यात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी ऑक्टोबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिका झाली होती. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
असा असणार आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, श्रेयश अय्यर, मनीष पांडे,दिनेश कार्तिक, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल,कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बेसिल थंपी,जयदेव उनाडकट.
अशी असेल भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिका:
२० डिसेंबर – पहिला सामना – कटक
२२ डिसेंबर – दुसरा सामना – इंदोर
२४ डिसेंबर – तिसरा सामना – मुंबई