भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 मधील महत्त्वाचा सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सुपर-8 फेरीतील हा सामनाच ठरवेल की भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात पुढे जाणार की त्यांचा प्रवास इथेच थांबणार. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. किमान दोन बदल तर निश्चित मानले जात आहेत, बाकी अंतिम निर्णय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) परिस्थिती पाहून घेईल.
हा सामना 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि साडेसहा वाजता टॉस होईल.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय सलामीवीरांची जोडी अद्याप एकही चांगली खेळी करू शकलेली नाही. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) असो वा इशान किशन (Ishaan kishan), सर्वच जण धावा काढण्यासाठी झगडताना दिसत आहेत. एका सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळाली, पण तोही लवकर बाद झाला. त्यामुळे आता अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करू शकतात, तर इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते. ईशान तीन नंबरवर आल्यास, तिलक वर्माला (Tilak Verma) चौथ्या आणि सूर्याला पाचव्या क्रमांकावर खेळावे लागेल.
या बदलामुळे रिंकू सिंगला (Rinku Singh) बाहेर बसावे लागू शकते. रिंकूच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने तो संघ सोडून गेला होता, आता तो परतला असला तरी त्याला पुरेशी फलंदाजी मिळालेली नाही. तो गोलंदाजीही करत नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी संजू सॅमसनला खेळवून ‘टॉप-3’ मधील डाव्या हाताच्या फलंदाजांची गर्दी कमी करण्याचा मॅनेजमेंटचा विचार आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये दुसरा बदल वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेल याच्या रूपाने होऊ शकतो. अक्षर पटेलने सुरुवातीच्या तीन सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या होत्या, तरीही त्याला बाहेर बसवून सुंदरला संधी देण्यात आली. मात्र, सुंदरला दोन सामन्यात एकही विकेट घेता आलेली नाही. त्यामुळे अक्षर पटेलचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, हे गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता टॉसच्या वेळीच स्पष्ट होईल.






