कोलंबो। आज श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघ सामील होणार असून आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत असा होणार आहे.
ही मालिका श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवण्यात येणार असून निदाहास ट्रॉफी असे या मालिकेचे नाव आहे. निदाहासचा अर्थ सिंहली भाषेत स्वातंत्र्य असा होतो. त्यामुळे या तिरंगी मालिकेचे नाव निदाहास ठेवण्यात आले आहे.
या मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीसह, एम एस धोनी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दीक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
त्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी उपकर्णधार रोहित शर्मा सांभाळेल. तसेच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघाला ही मालिका खेळावी लागणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने त्यांच्याकडे चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
यातील दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, विजय शंकर, मोहंमद सीराज आणि रीषभ पंत या नवीन तरुण चेहऱ्यांपैकी उद्या ११ जणांच्या भारतीय संघात कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.
भारतीय संघाने याआधी श्रीलंकेत झालेल्या मालिकेत पूर्ण वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या तिरंगी टी २० मालिकेतही असेच वर्चस्व ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
कुठे होईल श्रीलंका विरुद्ध भारत पहिला टी २० सामना?
उद्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध भारत संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील हा पहिलाच सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील सामना?
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून श्रीलंका विरुद्ध भारत सामन्याचे प्रसारण होईल?
श्रीलंका विरुद्ध भारत संघात होणार सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
उद्या होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅप वर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा भारतीय संघ:
रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत, मोहंमद सीराज, रीषभ पंत (यष्टीरक्षक)
अशी असेल निदाहास ट्रॉफी स्पर्धा:
६ मार्च – श्रीलंका विरुद्ध भारत
८ मार्च -बांगलादेश विरुद्ध भारत
१० मार्च -श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
१२ मार्च – भारत विरुद्ध श्रीलंका
१४ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश
१६ मार्च – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१८ मार्च – अंतिम सामना