मुंबई | भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये ऑगस्ट २०२० मध्ये तीन सामन्यांची टी२० सामन्यांची मालिका होऊ शकते अशी माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली.
जॅक फॉल म्हणाले की, या मालिकेविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यात चर्चा झाली आहे. सध्या दोन्ही देशात लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे ही मालिका होण्यासाठी संबंधित दोन्ही देशाच्या सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
दक्षिण अफ्रीकाचा क्रिकेट संघ मार्च महिन्यामध्ये एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्यानंतर कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातल्याने ही मालिका रद्द करावी लागली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारताविरुद्धची मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे. दोन्ही देशात ही मालिका झाली तर दक्षिण आफ्रिकेसाठी फायदेशीर ठरणार आहे. क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने याचा मोठा फटका क्रिकेट संघटनांच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. क्रिकेटमधील अर्थव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी सर्वच देश लॉकडाऊनंतर भारताबरोबर मालिका खेळण्यास उत्सुक आहेत.