दुबई। 28 सप्टेंबरला भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडलेल्या एशिया कप 2018 च्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत सातव्यांदा विजेतेपद मिळवले आहे.
या सामन्यात भारताला शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज असताना दुखापतग्रस्त असणाऱ्या केदार जाधवने विजयी धाव काढत भारताला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला.
या सामन्यात भारतासमोर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 223 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. मात्र भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने चांगल्या सुरुवातीनंतरही 15 धावांवर विकेट गमावली.
त्यानंतर काही वेळातच अंबाती रायडूनेही 2 धावांवर असताना आपली विकेट गमावली. यानंतर प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली.
पण ही भागीदारी रंगत असतानाच रोहितला रुबेल हुसेनने 48 धावांवर बाद केले. त्यामुळे भारताची आवस्था 3 बाद 83 धावा अशी झाली. पण त्यानंतर एमएस धोनीने कार्तिकसह चौथ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचत भारताला 130 धावांचा टप्पा पार करुन दिला.
परंतू ही जोडी तोडण्यात मदमुल्लहाला यश आले. त्याने कार्तिकला 37 धावांवर पायचीत केले. कार्तिक बाद झाल्यानंतर केदार जाधव फलंदाजीसाठी आला. परंतू त्याला फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंग त्रास सुरु झाल्याने धावा करण्यात त्रास होत होता.
त्यातच चांगल्या लयीत खेळणारा धोनी 36 धावा करुन बाद झाला. त्याला मुस्तफिजूर रेहमानने मुशफिकर रहिमकडे झेल देण्यास भाग पाडले.
यानंतर काही वेळातच केदारच्या वेदना वाढल्याने तो रिटायर्ड हार्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यामुळे भुवनेश्वर कुमार रविंद्र जडेजासह फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. या दोघांनी मात्र नंतर 52 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप पोहचवले होते.
पण भारताला विजयासाठी 11 धावांची गरज असताना जडेजाला रुबेल हुसेनने बाद केले. त्यामुळे केदार पुन्हा मैदानात आला. पण त्यानंतर पुढच्याच षटकात भुवनेश्वर कुमारनेही विकेट गमावली.
अखेर शेवटच्या षटकात भारताला 6 धावांची गरज होती. या धावा केदारने कुलदीप यादवला साथीला घेत पूर्ण केल्या.
बांगलादेशकडून मुस्तफिझूर रेहमान(2/38), नाझमुल इस्लाम(1/56), मश्रफे मुर्तझा(1/39), रुबेल हुसेन(2/26) आणि महमुद्दलाह(1/33) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली.
बांगलादेशकडून लिटॉन दास आणि मेहदी हसन या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. दासने या सामन्यात त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक झळकावले आहे.
त्याने 28. 4 षटकात त्याचे हे शतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने बांगलादेशकडून क्रिकेटच्या कोणत्याही अंतिम सामन्यात खेळताना सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या आहेत.
बांगलादेशला दास आणि मेहदी हसनने जरी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करुन चांगली सुरुवात दिली असली तरी हसन 32 धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशची मधली फळी कोलमडली आहे.
हसनला केदार जाधवने बाद केल्या नंतर काही वेळातच इम्रुल काइज, मुशफिकर रहिम आणि मोहम्मद मिथून यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. इम्रुलला 2 धावांवर असताना युजवेंद्र चहलने पायचीत बाद केले. तर मुशफिकरला केदारने जसप्रीत बुमराहकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 5 धावा केल्या.
यानंतर रविंद्र जडेजाने मिथूनलाही 2 धावांवर धावबाद करत बांगलादेशला चौथा धक्का दिला. त्याच्या पाठोपाठ कुलदीप यादवने लगेचच महमुद्दलाहला 4 धावांवर बाद केले. त्यामुळे बांगलादेशची आवस्था 5 बाद 152 धावा अशी झाली.
त्यानंतरही बांगलादेशच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. फक्त सौम्य सरकारने थोडीफार लढत दिली होती. त्याने 33 धावा केल्या. पण त्याला अंबाती रायडू आणि एमएस धोनीने मिळून धावबाद केले.
त्यामुळे बांगलादेशचा डाव 48.3 षटकात 222 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 45 धावात 3 विकेट्स घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी केदार जाधव(2/41), युजवेंद्र चहल(1/31) आणि जसप्रीत बुमराहने(1/39) विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
– गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार
–आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका