ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. आज भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने नायजेरियाला पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
भारतीय संघाने नायजेरियाला अंतिम फेरीत ३-० असे पराभूत करत आजच्या दिवसातले भारताचे तिसरे सुवर्णपदक तर एकूण नववे सुवर्णपदक जिंकले आहे.
भारतीय संघातील हरमीत देसाई आणि जी. साथियन या जोडीने मोटायो आणि एबीओडुन या नायजेरियाच्या जोडीला पराभूत करून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले. त्याचबरोबर ए शरथ कमलनेही चांगली कामगिरी करून सुवर्णपदक मिळवण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.
विशेष म्हणजे कालच भारतीय महिला संघानेही टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला टेबल टेनिसमध्ये कधीही सुवर्णपदक मिळाले नव्हते पण यावर्षी महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक मिळवल्याने नवा विक्रम रचला आहे.
यामुळे भारताच्या खात्यात आता १८ पदके झाली असून. यात ९ सुवर्णपदक, ४ रौप्य पदक तर ५ कांस्य पदकाचा समावेश आहे.