भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टी २० सामन्यात विजय मिळवून भारताला आघाडी घेण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात ५ सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मिताली राजने अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याचबरोबर स्म्रिती मानधनानेही आक्रमक खेळ केला होता.
१७ वर्षीय मुंबईकर फलंदाज जेमिमा रोड्रिगेजने आणि अखेरच्या काही षटकात वेदा कृष्णमूर्थीने आक्रमक खेळत मितालीला या सामन्यात भक्कम साथ दिली होती. त्यामुळे भारताची फलंदाजी मजबूत असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली होती. पण भारताची प्रमुख गोलंदाज झुलन गोस्वामी या मालिकेआधी दुखापतग्रस्त झाल्याने भारताला तिच्या अनुपस्थित खेळावे लागणार आहे.
दक्षिण अफ्रिका संघालाही कमी लेखून चालणार नाही, त्यांनीही पहिल्या टी २० सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्क चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. तसेच क्लो ट्रायऑनने पहिल्या टी २० सामन्यात स्फोटक खेळ करताना ७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी अजून झालेली नाही.
भारतीय महिला संघाने या टी २० मालिकेआधी पार पडलेली वनडे मालिका दिमाखात जिंकली होती. त्यामुळे या टी २० मालिकेतही सर्वांना भारतीय संघाकडून अशीच अपेक्षा असणार आहे.
दुसरा टी २० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी ४.३० वाजता सुरु होईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर(कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार),मिताली राज, वेदा कृष्णामूर्थी,जेमिमा रोड्रिगेज,दिप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया(यष्टीरक्षक), नुजत परवीन(यष्टीरक्षक), पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.