भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने २ विकेट्सने आपल्या खिशात घातला. तसेच ऑस्ट्रेलियाचा विजयी रथही रोखला. मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. यावेळी भारताच्या दोन महिला खेळाडूंनी अर्धशतक झळकावले, तर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी झूलन गोस्वामीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६४ धावा फलकावर लावत भारताला २६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने ४९.३ षटकातच ८ विकेट्स गमावत पूर्ण केले. (India Women vs Australia Women 3rd ODI India Won The Match By 2 Wickets )
४ वर्षांनंतर केले ऑस्ट्रेलियाला वनडेत पराभूत
यावेळी भारताकडून फलंदाजी करताना सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी सर्वाधिक धावा केल्या. शेफालीने ५६ आणि यास्तिकाने ६४ धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे हे दोन्हीही खेळाडूंचे पहिलेच अर्धशतक आहे. भारतीय संघाने ४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघाला वनडेत पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. मागील २६ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघाने वनडेत एकदाही पराभव पत्करला नव्हता.
शेफाली आणि यास्तिकाव्यतिरिक्त दीप्ति शर्माने ३१, स्नेह राणाने ३० आणि स्म्रिती मंधानाने २२ धावा केल्या. शेवटी ४७ व्या षटकात दीप्तिने आपली विकेट गमावली. मात्र, स्नेहने याच षटकात ताहलिया मॅकग्राच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार ठोकत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले. त्यानंतर ४९ व्या षटकात स्नेहलाही पव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, झूलन गोस्वामीने शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍनाबेल सदरलँडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच निकोला कॅरे, स्टेला कॅम्पबेल, ऍश्ले गार्डनर, सोफी मॉलिनेक्स, तहलिया मॅकग्रा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर, बेथ मूनी, तहलिया मॅकग्रा यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऍश्लेने ६७, बेथने ५२, तर तहलियाने ४७ धावा केल्या. तसेच एलिसा हिली आणि एलिस पेरी यांनी अनुक्रमे ३५ आणि २६ धावा केल्या. इतर फलंदाजांना १५ धावसंख्याही पार करता आली नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येक ३ विकेट्स घेतल्या. तसेच स्नेह राणानेही एक विकेट्स आपल्या नावावर नोंदवली.
आता भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात १ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळायचे आहेत. कसोटी सामना ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान खेळला जाणार आहे. तसेच ७ ऑक्टोबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!
-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?