दिल्ली। येथे पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली असली तरी भारताने ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
त्यामुळे भारताने आता सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने हा विक्रम ऑक्टोबर २००५ ते जून २००८ मध्ये केला होता. तर भारताने जुलै २०१५ मध्ये जेव्हा श्रीलंका संघाने भारताचा दौरा केला होता तेव्हापासून भारतीय संघ कसोटी मालिकेत अपराजित आहे.
या काळात भारताने ३ वेळा श्रीलंका संघाला तर ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, न्यूझीलंड, विंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रत्येकी एक वेळा हरवले आहे.
त्याचबरोबर या ९ कसोटी मालिका विजयात कोहलीने ६४.४५ च्या सरासरीने आणि १० शतकांच्या मदतीने २७०७ धावा केल्या. तोच या काळात कसोटीत भारताकडून सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाने जेव्हा सलग ९ कसोटी मालिका जिंकल्या होत्या त्याही वेळी रिकी पॉन्टिंग या ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने या ९ कसोटी मालिका विजयात १२ शतकांच्या मदतीने ६८.०४ च्या सरासरीने २७९० धावा केल्या होत्या.