मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने १४३ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकाने अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर ८ बाद २४८ धावा केल्या.
भारताने दिलेल्या ३९३ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. फक्त अनुभवी फलंदाज मॅथ्यूज खेळपट्टीवर टिकून राहिला होता. त्याने १३२ चेंडूत नाबाद १११ धावा केल्या. त्याने या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार मारले. परंतु त्याला बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही.
फक्त असेला गुणरत्नेने थोडीफार साथ दिली परंतु तोही ३४ धावा करून बाद झाला. त्याच्याआधी निरोशन डिकवेल्ला २२ धावांवर बाद झाला होता. श्रीलंकेचे सलामीवीर दनुष्का गुनथिलका(१६) आणि उपुल थरांगा(७) हे देखील लवकर बाद झाले. तसेच कर्णधार थिसेरा परेराला (५) देखील विशेष काही करता आले नाही.
भारताकडून युजवेंद्र चाहल (३/६०), जसप्रीत बुमराह(२/४३), वॉशिंग्टन सुंदर(१/६५), हार्दिक पंड्या(१/३९) आणि भुवनेश्वर कुमार(१/४०) यांनी बळी घेतले.
तत्पूर्वी भारताकडून या मालिकेत कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने द्विशतकी खेळी करताना १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा केल्या. तसेच शिखर धवन(६८) आणि श्रेयश अय्यरने(८८) अर्धशतकी खेळी केली. याच जोरावर भारताने ३९२ धावांचा टप्पा गाठला होता. भारताने आत्तापर्यंत १०० वेळा वनडेत ३०० धावांचा टप्पा पार केला आहे.