जयपूर| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवार रोजी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेतील पहिला सामना रंगला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावत १६४ धावा केल्या. मार्क चॅपमन आणि सलामीवीर मार्टिन गप्टिल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १९.४ षटकात हा सामना जिंकला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने खणखणीत चौकार मारत संघाला विजयी शेवट करून दिला.
न्यूझीलंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादने सर्वाधिक धावा फटकावल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ४० चेंडूत ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच रोहित शर्मानेही कर्णधार खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले. मात्र केवळ २ धावांची त्याचे अर्धशतक हुकले. ३६ धावांवर २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ४८ धावा केल्या.
याव्यतिरिक्त रिषभ पंतनेही २० व्या षटकात धाकधूक वाढवणारी स्थिती निर्माण झाल्यानंतर चौकार खेचत संघाला मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना संघासाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ३ चौकार ठोकले. गप्टिलव्यतिरिक्त चॅपमननेही अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. त्याने ५० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ धावा चोपल्या.
परंतु या दोघांना वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांनी मात्र भारताच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. भारताकडून अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच दिपक चाहर आणि मोहम्मद सिराजनेही एका-एका विकेटचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकून भारताने निवडली गोलंदाजी
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल तर न्यूझीलंडच्या नेतृत्त्वाची धुरा टीम साउथीच्या हातात असेल. या सामन्यापूर्वी संध्याकाळी ६.६० वाजता उभय संघांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात पडला आहे. कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
या सामन्यातून भारतीय संघाकडून वेंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड संघातही ४ बदल करण्यात आले आहेत. जिम्मी नीशम, कायल जेमीसन, ईश सोधी आणि ऍडम मिल्ने यांना बाकावर बसवत मार्क चॅपमन, टॉड ऍस्टल, रचिन रवींद्र आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (पंत), वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज.
असा आहे न्यूझीलंड संघ-
मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम साउथी (कर्णधार), टॉड ऍस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट