भारताचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला कोरोना झाला आहे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन वनडे सामन्याच्या मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND ODI Series) यांच्यातील वनडे मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सुंदर उर्वरित भारतीय संघासह केपटाऊनला जाणार होता. मात्र, आता ते सोपे दिसत नाही. सुंदर सध्या मुंबईत असल्याचे समजते. येथून भारतीय एकदिवसीय संघातील खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचे आहे. हे खेळाडू १२ जानेवारीला सकाळी रवाना होतील. (Washington Sundar Corona)
पुनरागमनाच्या आहे प्रतीक्षेत
सुंदर जवळपास १० महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्च २०२१ मध्ये तो इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. यानंतर दुखापतीमुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलमधूनही बाहेर होता. सुंदरने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघात स्थान मिळवले होते. त्याची येथे कामगिरी उल्लेखनीय होती. यानंतर, भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन लांबणीवर पडू शकते, असे पुन्हा एकदा दिसून येत आहे.
बीसीसीआयने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. मात्र, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सुंदर संघासोबत दक्षिण आफ्रिकेत जाणार नाही.” केएल राहुल एकदिवसीय मालिकेत कर्णधार असेल. या संघात आर अश्विन आणि युझवेंद्र चहलच्या रूपाने दोन फिरकीपटू आहेत. मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारी रोजी पर्ल येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना याच शहरात २१ जानेवारीला आणि शेवटचा सामना २३ जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल.
अशी राहिली आहे कारकीर्द
सुंदरने भारतासाठी आतापर्यंत चार कसोटी, एक वनडे आणि ३१ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ६ विकेट आणि २६५ धावा, वनडे सामन्यात एक विकेट आणि टी२० मध्ये २५ विकेट आहेत. त्याने जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी पदार्पण केले. येथे ब्रिस्बेनमध्ये पहिल्याच कसोटीत त्याने अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतही त्याने अप्रतिम अर्धशतक ठोकले. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१७ मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो या प्रकारात खेळला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलला मिळाला नवा स्पॉन्सर! टाटांच्या नावाने ओळखली जाणार सर्वात मोठी टी२० लीग (mahasports.in)